शहरात 'आप'ने लावले 'मोदी हटाव, देश बचाव'चे बॅनर
शहरात 'आप'ने लावले 'मोदी हटाव, देश बचाव'चे बॅनर
कोल्हापुर - शहरात ठिकठिकाणी 'मोदी हटाव, देश बचाव' या आशयाचे बॅनर सकाळी पाहायला मिळाले. हे बॅनर कोणी लावले याबाबत शहरभर चर्चा सुरू झाली असतानाच आम आदमी पार्टीने पत्रकार परिषद घेऊन 'मोदी हटाव, देश बचाव' ही मोहीम शहरात सुरू केली असल्याचं जाहीर केलं.
ज्याप्रमाणे इंग्रजांनी देशातील नागरिकांवर दडपशाही केली, त्याच पद्धतीची दडपशाही मोदी सरकार करत आहे. हिंडनबर्ग रिपोर्टने अदानी समूहाचा घोटाळा उघडकीस आणला. एलआयसी, एसबीआय या सरकारी संस्थांची, तसेच सामान्य नागरिकांची गुंतवणूक यामुळे धोक्यात आल्याने त्यावर संयुक्त संसदीय समितीने चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी संसदेत लावून धरली. परंतु गेले दोन आठवडे खुद्द सरकारी पक्षाने संसदेत गदारोळ घालून अदानी सारख्या भांडवलदारांना वाचवण्याचा प्रयत्न मोदी सरकारनं केला.
ईडी-सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशभरात अनेक पत्रकारांवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा यासारख्या कायद्यांचा गैरवापर करून तुरुंगात टाकले जात आहे. महागाई, बेरोजगारीने सामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मोदी सरकारला केंद्राच्या सत्तेतून पायउतार केल्याखेरीज पर्याय उरलेला नाही. त्यामुळे आम आदमी पार्टीनं देशभरात 'मोदी हटाव, देश बचाव' ही मोहीम देशभर सुरू केली आहे. शहरात लागलेले बॅनर आम आदमी पार्टीने लावले आहेत. ही मोहीम म्हणजे केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात फुंकलेले रणशिंग आहे. देशाला आता शिकलेला पंतप्रधान अपेक्षित आहे. या मोहिमेला देशभरातुन पाठिंबा मिळत असल्याचे 'आप'चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले. ही मोहीम सुरूच राहणार असून जिल्हाभर आणखी बॅनर-पोस्टर लावले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आलं.
यावेळी निलेश रेडेकर, उत्तम पाटील, अभिजीत कांबळे, दुष्यंत माने, समीर लतीफ, अमरसिंह दळवी, लाला बिरजे, भाग्यवंत डाफळे, संजय नलवडे, प्रथमेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
( ही माहिती spn news वरून पडताळून घेतली आहे . )
Comments
Post a Comment